क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २१ जुलै २०२६

क्राइम रिपोर्ट - शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २१ जुलै २०२६

 क्राइम रिपोर्ट 

शहरातील गुन्हेगारीविषयक बातम्या - २१ जुलै २०२६ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 आळंदीत महिलेची बांधकाम व्यावसायिकाला मारहाण 

'इथे काम करायचे नाही', या कारणावरुन एक तरुणीने बांधकाम व्यावसायिकाला दगडाने मारहाण केली. ही घटना आळंदी येथील भाजी मंडई परिसरात सोमवारी (ता. २०) घडली आहे. आरोपी महिलेविरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, बांधकाम व्यावसायिक रोहन नंदकुमार कुऱ्हाडे (वय ३७, रा. विठ्ठल-रुक्मिणी चौक, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नौषाद सिकंदर पठाण (रा. आळंदी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २०) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  भाजी मंडई शेजारी असलेल्या इंद्रायणी टॉवर परिसरात हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या इमारतीलगत राहणाऱ्या महिलेने ''येथे काम करायचे नाही" या कारणावरून बांधकाम व्यावसायिकाशी वाद घातला व बांधकाम व्यावसायिकास शिवीगाळ केली. फिर्यादी कुऱ्हाडे हे त्या महिलेला समजावून सांगत असताना आरोपीने महिलेने दगड उचलून फिर्यादीवर फेकला. त्यात कुऱ्हाडे यांच्या डाव्या हाताच्या करंगळी व शेजारच्या बोटाला दुखापत झाली.

या प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५२ तसेच संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 चिखलीत सायबर फसवणुकीप्रकरणी तरुणावरर गुन्हा दाखल

बॅंकेत खाते उघडून त्या बँक खात्यावर तीन नागरिकांकडून एकूण १ लाख १० हजार ३३४ रुपये घेतल्याप्रकरणी चिखली पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस शिपाई आकाश ज्ञानेश्वर नायकोजी (बकल क्रमांक ३४८१, चिखली पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित ज्ञानेश्वर भानुसे (रा. मोशी, मूळ रा. जि. बुलढाणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका बँकेत खाते उघडून साथीदारांशी संगनमत करून सायबर फसवणूक करणाऱ्या गटाचा सदस्य म्हणून ते खाते वापरले. संबंधित खात्यामध्ये देशातील तीन नागरिकांकडून फसवणुकीद्वारे एकूण १ लाख १० हजार ३३४ रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हा प्रकार २९ मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शिवप्रसाद, जेएसपीएम कॉलेजजवळ तसेच अभंग विश्व फेज-२, देहू-आळंदी रस्ता, चिखली परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात रविवारी (दि. २०) भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच आर्म्स अॅक्टमधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक

सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मारुती मुकींदा शिकरे (वय ६५, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय श्रीरंग सोनोने (रा. जि. अकोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २०२४ मध्ये फिर्यादी यांच्या जावयाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी फिर्यादी यांच्याकडून नऊ लाख रुपये घेतले. मात्र, कोणतीही नोकरी लावून दिली नाही तसेच घेतलेली रक्कम परत केली नाही. त्यामुळे आरोपीने विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर २०२४ पासून २० जुलै २०२६ पर्यंत पिंपळे गुरव येथील कृष्णकली, जगताप इस्टेट परिसरात घडला.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 सायबर फसवणुकीच्या रकमेसाठी बँक खाते वापरल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

सायबर फसवणुकीच्या रकमेसाठी स्वतःचे बँक खाते उपलब्ध करून दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडमधील एका २७ वर्षीय तरुणाविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीच्या संगनमताने आर्थिक व्यवहार केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी महिला पोलिस शिपाई साक्षी भागवत माने (बक्कल क्रमांक ३८३६), पिंपरी पोलिस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविणकुमार (वय २७, रा. फ्लॅट क्रमांक ३७५८, सेक्टर ३३, शिवप्रसाद कॉलनी, रोड बी-१५, पिंपरी-चिंचवड) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११२(२), ६१(२), ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६६(क), ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने ‘द कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’मधील स्वतःच्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करून दिला. या खात्यातून एकूण २ लाख ७१ हजार ४२९ रुपये ७० पैसे इतक्या रकमेचे व्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या आर्थिक व्यवहारांमध्ये भारतातील सात नागरिकांच्या तक्रारींमधील फसवणुकीची रक्कम असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपीने सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीतील सदस्य म्हणून संगनमत केल्याचा संशय असून, पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 कार वळवण्यावरून झालेल्या वादातून मोशीत व्यावसायिकाला मारहाण; अंगठा फ्रॅक्चर

कार अचानक वळवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एका व्यावसायिकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना मोशी येथे घडली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी कुणाल भास्कर तोडकर (वय ४३, रा. कल्चर क्रिस्ट सोसायटी, रो हाऊस क्रमांक ए-२, सेक्टर ६, स्पाईनरोड, मोशी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू सुभाष येदे, गोविंद कांबळे आणि गौरव शर्मा (तिघेही वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे, रा. मोशी परिसर) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कुणाल तोडकर हे त्यांचा १४ वर्षीय मुलगा देवांश याच्यासोबत कल्चर क्रिस्ट सोसायटीच्या गेटजवळ पायी फिरत होते. त्यावेळी वाईन शॉपसमोर उभी असलेली पांढऱ्या रंगाची कार (क्रमांक एमएच १४ एफएम ८४४४) चालकाने कोणताही सिग्नल न देता अचानक फिर्यादीच्या जवळून वळवली.

यावेळी तोडकर यांनी हातवारे करून चालकाला विचारणा केली असता चालकाने त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कार गेटजवळ थांबवून आरोपींनी एकत्र येत फिर्यादीशी वाद घातला. कारमध्ये बसलेल्या एका आरोपीने लाकडी दांडके काढून दुसऱ्या आरोपीला दिले. त्यानंतर दांडक्याने मारहाण केल्याने तोडकर यांच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत होऊन तो फ्रॅक्चर झाला. घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

🟧 मालमत्तेच्या वादातून बहिणीसह मेहुण्याकडून मारहाण, दोघांवर गुन्हा

मालमत्तेच्या वादातून एका महिलेने पत्नीच्या साथीने आपल्या बहिणीला शिवागीळ व मारहाण केली. या प्रकरणी प्रकरणी बहिण व मेहुण्याविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना विद्यानगर-चिंचवड येथे घडली आहे. 

मारहाण झालेल्या मनीषा भारत जाधव (वय ४४, रा. गंजपेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पल्लवी दत्ता भोसले (रा. विद्यानगर, चिंचवड) आणि दत्ता दिगंबर भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जुलै रोजी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी या वडिलांच्या विद्यानगर, चिंचवड येथील घरी गेल्या होत्या. त्यावेळी मालमत्तेच्या वादातून आरोपींनी "तू इथे का आली?" असे म्हणत शिवीगाळ केली व हाताने मारहाण केली. तसेच, "पुन्हा इथे आलीस तर तुला बघते," अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी महिलेने घरासमोर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डाव्या हातावर मारल्याने त्या जखमी झाल्या.

या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories