ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल, १ एप्रिल ते ४ जून २०२६ पर्यंत २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित
ऑनलाइन कर भरण्याकडे नागरिकांचा वाढता कल, १ एप्रिल ते ४ जून २०२६ पर्यंत २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित
२ लाख ४९ हजार नागरिकांनी घेतला १० टक्के सवलतीचा लाभ
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्ष (२०२६-२७) मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दिनांक १ एप्रिल २०२६ ते ४ जून २०२६ दुपारी २:३० वाजेपर्यंत २८९ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षातील कर संकलन मोहिमेला सकारात्मक सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत शहरातील २ लाख ७८ हजार १७ अधिक मिळकतधारकांनी आपल्या मालमत्तेचा कर भरला आहे, अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
महापालिकेकडून मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, विशेषतः ३० जूनपूर्वी कर भरणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या सवलतींना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ऑनलाइन पद्धतीने कर भरणाऱ्या नागरिकांना १० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात असल्याने डिजिटल व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत २ लाख ४९ हजार १४३ नागरिकांनी ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरून सवलतीचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून २६५ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक मालमत्ता कराचा भरणा करण्यात आला असून, नागरिकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढता कल अधोरेखित होत आहे.
पिंपरी चिंचवड शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मिश्र वापराच्या मालमत्ता तसेच मोकळ्या जागांसह एकूण ७ लाख ४४ हजार ६३० नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्ताधारकांना चालू आर्थिक वर्षाचे कर देयक वेळेत प्राप्त व्हावे, यासाठी कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत व्यापक स्तरावर नियोजन करण्यात आले होते. विशेषतः महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता कर बिल वाटप मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली असून, त्यामुळे नागरिकांना वेळेत कर देयके उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
महापालिकेकडून कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी थकबाकीदारांविरोधातही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या मिळकतधारकांविरोधात जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून, आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटिसांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी तातडीने मालमत्ता कर भरून पुढील प्रशासकीय कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
महापालिकेकडून महिलांच्या नावावरील निवासी मालमत्ता, दिव्यांग व्यक्तीच्या नावावर असलेले मिळकतधारक तसेच पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या निवासी गृहनिर्माण संस्थांसाठी विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. विशेषतः महिलांच्या नावावर एकमेव निवासी मालमत्ता असल्यास ३० टक्क्यांपर्यंत सवलतीचा लाभ मिळत असून, नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा...
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल सेवा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मालमत्ता कर हा शहराच्या विकासाचा महत्त्वाचा आर्थिक स्रोत असून, नागरिकांनी वेळेत कर भरल्यास शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सेवांच्या गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा करण्यास मदत होते. महापालिकेकडून विविध सवलती देण्यात येत असून, नागरिकांनी ३० जूनपूर्वी मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
कर संकलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद...
चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर संकलनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली असून, डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळत आहे. महापालिकेकडून महिलांच्या नावावरील मालमत्ता, दिव्यांग व्यक्तीच्या नावावर असलेले एका मालमत्तावर, पर्यावरणपूरक गृहनिर्माण संस्था तसेच वेळेत कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता तातडीने मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा.
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
किवर्ड्स विथ कॉमा मराठी इंग्लिश एकत्र