नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून विशेष सखोल पुनरीक्षणात सहभागी व्हावे - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करून विशेष सखोल पुनरीक्षणात सहभागी व्हावे - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
एसआयआर अभियानाचा महापालिका स्तरावर आढावा मतदार यादी अचूक करण्यावर भर
पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, माहिती पडताळणी तसेच नागरिकांच्या प्रतिसादाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस पिंपरी चिंचवड महापालिका उप आयुक्त सचिन पवार, मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत, अर्चना यादव, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत उप आयुक्त सचिन पवार यांनी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. बीएलओंकडून सुरू असलेल्या घरोघरी भेटी, अर्ज संकलन, प्रलंबित प्रकरणांची स्थिती तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेतील विविध बाबींची माहिती त्यांनी दिली. निर्धारित कालमर्यादेत सर्व कामे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय नियोजन करून नियमित पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक बीएलओने जबाबदारीने काम करावे, असे निर्देश दिले. मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची काळजीपूर्वक पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला.
बैठकीत बीएलओंच्या घरोघरी भेटींची प्रगती, अर्ज संकलन, प्रलंबित प्रकरणे तसेच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या अर्जांच्या निकाली काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. अभियानातील प्रत्येक टप्प्यावर नियमित आढावा घेऊन कामाची गुणवत्ता आणि गती कायम ठेवण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, "विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम हा मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे. तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही तपशीलात दुरुस्ती अथवा अद्ययावत माहिती आवश्यक असल्यास संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट होणे ही लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक बाब आहे.
उप आयुक्त सचिन पवार यांनी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना विभागनिहाय समन्वय ठेवून विशेष सखोल पुनरीक्षण अभियानातील सर्व कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मतदार यादी अधिक अचूक, त्रुटीमुक्त आणि अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक अर्जाची वेळेत पडताळणी व निकाली काढण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.
उप आयुक्त सचिन पवार म्हणाले, "विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी महापालिकेने विभागनिहाय नियोजन करून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मतदारांची माहिती अचूकपणे पडताळावी. नागरिकांनीही आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून सहकार्य करावे. प्रत्येक अर्जाची नियोजित कालमर्यादेत पडताळणी करून त्रुटीमुक्त आणि अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी समन्वयाने काम करत आहेत.
Enumeration form २९जुलै २०२६ पूर्वी भरणे गरजेचे.....
''पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते कि, दिनांक ३० जून २०२६ पासून मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू झाले आहे. आपल्या नजीकच्या शाळेत आपण ज्या ठिकाणी मतदान करत आहात, तेथील बीएलओ यांना भेटून अथवा बीएलओ आपल्या घरी आल्यानंतर ईएफ फॉर्म भरून त्यास पोहच द्यावी. आपण ऑनलाईन ही फॉर्म भरू शकता त्यासाठी
या lnk6.in/PCMCHO/eo6c-QYOc संकेतस्थळावर जाऊन आपण माहिती भरू शकता.आपण Enumeration form २९जुलै २०२६ पूर्वी न भरल्यास आपले नाव प्रारूप यादीमध्ये येणार नाही कृपया नोंद घ्यावी.'' - अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे