पाण्याचा काटकसरीने वापर करा, गैरवापर करणाऱ्यांवर होणार आता कडक कारवाई

पाण्याचा काटकसरीने वापर करा,  गैरवापर करणाऱ्यांवर होणार आता कडक कारवाई

पिंपरी | १५ ऑक्टोबर २०२६ : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे भविष्यात निर्माण होणारी पाणीटंचाई टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

शासनाच्या सूचनांनुसार उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रभाग स्तरावर विशेष तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

महापालिकेने गृहनिर्माण सोसायट्यांना उद्याने, हिरवळ आणि झाडांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी एसटीपी आणि जीटीपीमधील प्रक्रियायुक्त पाणी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाहने, टेरेस आणि अंगण धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये. सर्व्हिस सेंटरमध्ये अनधिकृत नळजोड आढळल्यास तो बंद करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच नळजोडाला विद्युत पंप लावून पाणी उपसा केल्यास पंप जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नवीन गृहप्रकल्पांना पिण्याच्या पाण्यापुरते मर्यादित व्यासाचे नळजोड देण्यात येतील. वॉशिंग सेंटर आणि मोठ्या व्यावसायिक प्रकल्पांना नवीन नळजोड दिले जाणार नाहीत. व्यावसायिक आस्थापना आणि बांधकाम प्रकल्पांनी पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बांधकामासाठी महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रियायुक्त पाणी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीतून अनधिकृत पाणी उपसा करून टँकरद्वारे विक्री करणाऱ्यांवरही फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी पाण्याच्या टाक्यांमधील गळती रोखावी आणि जलवाहिन्यांची गळती आढळल्यास पाणीपुरवठा विभागाला कळवावे. भूजलाची पातळी लक्षात घेऊन बोअरवेलच्या पाण्याचाही मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पाण्याची बचत करणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांचा महापालिकेतर्फे सन्मान करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories