पीएमआरडीएत महिला आरोग्य संवादसत्र; बागेश्री मंथाळकर यांचे मार्गदर्शन
पुणे | १५ ऑक्टोबर २०२६ : महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात; मात्र या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे हा स्वार्थ नसून कुटुंबाच्या सक्षमतेची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या बागेश्री मिलिंद मंथाळकर यांनी केले.
केंद्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘महिलांचे आरोग्य आणि स्वच्छता’ या विषयावर विशेष संवादसत्र आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या आणि एमएनजीएलच्या स्वतंत्र महिला संचालिका बागेश्री मंथाळकर यांनी महिलांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
मंथाळकर यांनी महिलांमधील हिमोग्लोबिन आणि विविध पोषणतत्त्वांच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्या मते, अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिन, व्हिटॅमिन बी१२, बी३ आणि ओमेगा यांसारख्या पोषणघटकांची कमतरता आढळते. त्यामुळे जंक फूड आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांऐवजी जवस, तीळ, कारळे, शेवग्याचा पाला, पडवळ, दुधी भोपळा, कोशिंबीर आणि सॅलड यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
महिलांनी दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे, सात ते आठ तासांची झोप घ्यावी आणि नियमित व्यायाम करावा. मोबाईल व सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे झोपेवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक स्वास्थ्यही महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत त्यांनी तणाव कमी करण्यासाठी भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात महिलांनी वर्षातून किमान एकदा आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. नियमित तपासणीमुळे आरोग्याच्या संभाव्य समस्या वेळेत लक्षात येण्यास मदत होऊ शकते, असे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमाला पीएमआरडीएच्या सहआयुक्त रूपाली आवले-डंबे आणि उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी सविता नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशासन विभागाच्या अधीक्षिका विशाखा चिंतल यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. संवादसत्रात पीएमआरडीएच्या महिला अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.