पिंपळे निलख | १९ ऑक्टोबर २०२६ : रस्त्यावरून बाजूला थांबा सांगितल्याचा राग मनात धरून एका रिक्षा चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना पिंपळे निलख परिसरात घडली. या मारहाणीत चालकाच्या डोक्यावर लाकडी फळीने वार करण्यात आला. तसेच गळा आवळून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास पिंपळे निलख येथील ६६ अव्हेन्यू सोसायटीजवळ ही घटना घडली.
या प्रकरणी नारायण बाबुराव करंडे (वय ५० वर्षे, व्यवसाय चालक, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी त्यांच्या एमएच १४ एएम १३७७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाने घरी जात होते. त्यावेळी ६६ अव्हेन्यू सोसायटीजवळ रस्त्यावर चार अनोळखी व्यक्ती थांबल्या होत्या. गाडी वळवण्यास अडचण येत आहे रस्त्यावरून बाजूला थांबा असे सांगितले.
मात्र, या कारणावरून आरोपींपैकी एकाने फिर्यादीची कॉलर पकडून शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी फळीने फिर्यादीच्या हनुवटीवर आणि डाव्या डोळ्याच्या वरच्या भागावर मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मारहाणीदरम्यान फिर्यादी जमिनीवर पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या तोंडावर हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने कमरेचा पट्टा काढून फिर्यादीच्या मानेच्या पाठीमागून जोराने आवळल्याचा आरोप आहे.
‘आज तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देत गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या मारहाणीत ते जखमी झाले.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अब्बू ऊर्फ अभिजीत मेश्राम, प्रदीप बोईने, आकाश दिलीपसिंग ठाकूर (वय २८ वर्षे) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश असल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.
आकाश दिलीपसिंग ठाकूर याला अटक करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ११५(२), ३५२ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.