पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना 'बॉडी कॅमेरे' मिळणार, वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची माहिती
Mar 07 2026
76
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना 'बॉडी कॅमेरे' मिळणार, वाहतूक पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांची माहिती
पिंपरी, ता. ७ - महाराष्ट्र सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे लावण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांना लवकरच ४५० बॉडी कॅमेरे मिळणार आहेत. याबाबत वाहतूक शाखेने गृह विभागाला पत्र पाठवले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी दिली आहे.
राज्य सरकारने डिसेंबर २०२५ मध्ये वाहतूक पोलिसांसाठी बॉडी कॅमेरे लावण्याची घोषणा केली होती. या घोषणेच्या अंमलबजावणीची सुरवात प्रमुख शहरांपासून होत आहे. विस्तारणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात दररोज वाहतूकीच्या नियमांवरुन नागरीक व पोलिसांमध्ये वाद होत असतात. हे वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी हे कॅमेरे फार उपयुक्त ठरतील. या कॅमेऱ्यांमुळे नागरिक आणि वाहतूक पोलिसांमधील परस्पर विश्वास वाढेल. सामाजिक संस्थांकडून पोलिसांना बॉडी कॅमेरे असावेत ही मागण होती, असे पोलिस उपायुक्त पाटील यांनी सांगितले.
कॅमेऱ्यांमुळे दोषी पोलिसांवर कारवाई करणे सोपे....
''पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या १३ वाहतूक विभागांना ४५० बॉडी कॅमेऱ्यांची आवश्यकता असल्याचे शासनास कळवले आहे. या कॅमेऱ्यांमुळे नागरिकांना खोटी तक्रार करता येणार नाही, तसेच दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे सोपे होईल.''
- विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा