पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत शाळांच्या यादीतून दोन शाळांची नावे गायब कशी ? ................. लोकशाही युवा फाऊंडेशनकडून प्रश्न उपस्थित, उच्चस्तरीय चौकशीची मागणी, आयुक्तांसह अधिकाऱ्यांना निवेदन
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत शाळांच्या यादीतून दोन शाळांची नावे गायब कशी ?
लोकशाही युवा फाऊंडेशनकडून प्रश्न उपस्थित, उच्चस्तरीय चौकशीची मागणी, आयुक्तांसह अधिकाऱ्यांना निवेदन
पिंपरी, ता. १२ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. शिक्षण विभागाने दोन अनधिकृत शाळांची नावे हेतुपुरस्सर यादीतून वगळल्याचा आरोप लोकशाही युवा फाऊंडेशनने (महाराष्ट्र राज्य) केला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करुन फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या आठवडाभरात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही फाउंडेशनने दिला आहे.
लोकशाही युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन मौलाली शेख यांच्या स्वाक्षरीने शिक्षण आयुक्त, विभागीय शिक्षण उपसंचालक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त, महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिक्षण मंडळ सभापती यांना तक्रार अर्ज सादर करण्यात आला आहे.
या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकारी संगिता बांगर यांनी यापूर्वीच दोन शाळांना अधिकृतपणे बंद करण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. त्यामध्ये पिंपळे सौदागर येथील किरण एज्युकेशन ट्रस्ट यांना १० मे २०२५ रोजी तर भोसरी येथील प्रिती इंग्लिश स्कूल यांना ९ जून २०२५ रोजी नोटिस देण्यात आली होती. मात्र, या दोन्ही शाळांचा समावेश सन २०२६-२७ साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनधिकृत शाळांच्या अधिकृत यादीत करण्यात आलेला नाही.
यामुळे शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांनी संगनमत करुन अनधिकृत शाळांना संरक्षण दिल्याचा संशय आहे.
आर्थिक व्यवहार अथवा भ्रष्टाचारातून हा प्रकार घडल्याची दाट शक्यता असल्याचा आरोप लोकशाही युवा फाऊंडेशनने केला आहे. अशा अनधिकृत शाळांना अभय दिल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले असून पालकांची आर्थिक फसवणूक होत आहे. त्यामुळे या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून दोषींवर निलंबन व फौजदारी गुन्हे दाखल करावेत. प्रिती इंग्लिश मिडीयम आणि किरण एज्युकेशन ट्रस्ट या दोन्ही शाळांचा तातडीने अनधिकृत शाळांच्या यादीत समावेश करुन सुधारित यादी प्रसिद्ध करावी, संबंधित शाळांवर प्रत्यक्ष बंदीची कारवाई करून पालकांना सतर्क करावे, अशीही मागणी अर्जात करण्यात आली आहे.
येत्या सात दिवसांत महापालिका शिक्षण विभागाने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लोकशाही युवा फाऊंडेशनने प्रशासनाला दिला आहे.
- पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील जाहीर करण्यात आलेल्या अनधिकृत शाळांची यादी -
१) ब्लूमिंग बड्स स्कूल, ताथवडे
२) लिटल स्टार इंग्लिश मिडियम स्कूल, चिंचवडेनगर
३) माउंट एव्हरेस्ट इंग्लिश स्कूल, कासारवाडी
४) डीएमके इंटरनॅशनल स्कूल, कासारवाडी
५) माने इंग्लिश मिडियम स्कूल, काळेवाडी
६) नर्चर इंटरनॅशनल स्कूल, चिखली-काळेवाडी परिसर
७) माइंडवर्ल्ड इंटरनॅशनल स्कूल, चिखली-काळेवाडी परिसर
८) कॅटॅलिस्ट इंटरनॅशनल स्कूल, चिखली फाटा
९) हेम्स इंटरनॅशनल स्कूल, वाकड
१०) गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल, मोशी