पिरंगुट घाटात जुन्या वादातून तरुणांना मारहाण; लोखंडी रॉडने हल्ला

पिरंगुट घाटात जुन्या वादातून तरुणांना मारहाण; लोखंडी रॉडने हल्ला

पिरंगुट | १२ ऑक्टोबर २०२६ : मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाटात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या त्याच्या मित्रालाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच पोलिसांत तक्रार दिल्यास पुन्हा मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिर परिसरात घडली.

या प्रकरणी विजय रुक्माजी नरवडे (वय २० वर्षे) यांनी फिर्याद दिली असून नितेश भारती (वय २५ वर्षे, राहणार लवळे फाटा, लवळेगाव, ता. मुळशी) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य दोन साथीदारांची नावे व पत्ते अद्याप समोर आलेले नाहीत.

फिर्यादीनुसार, विजय नरवडे यांचा मित्र हर्षद हा मोटारसायकलवरून येत असताना त्याच्या ओळखीचा नितेश भारती दोन मित्रांसह तेथे आला. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नितेशने हर्षदला शिवीगाळ केली. त्यानंतर धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हे भांडण पाहून विजय नरवडे मध्यस्थी करण्यासाठी गेले. मात्र, त्यावेळी नितेशने हातातील लोखंडी रॉडने हर्षदच्या डाव्या पायावर आणि डाव्या हातावर वार केले. या मारहाणीत हर्षद जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर नितेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी विजय नरवडे यांनाही धक्काबुक्की केली. नितेशने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.

एवढ्यावरच न थांबता, पोलिसांत तक्रार दिल्यास पुन्हा मारहाण करण्याची धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५१६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories