थेरगाव | १२ ऑक्टोबर २०२६ : पानटपरीचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर दरमहा दहा हजार रुपयांचा हप्ता सुरू कर, अन्यथा धंदा बंद करीन, अशी धमकी देऊन पानटपरी चालकाकडून पैसे उकळल्याचा प्रकार थेरगावमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल कारभारी चव्हाण (वय ३४ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भाऊसो हरी दगडे (वय ४० वर्षे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, थेरगाव येथील मल्हार पान शॉप, धनगरबाबा मंदिर परिसरात १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ४८ मिनिटांपासून, १९ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांपर्यंत आणि २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला.
आरोपीने फिर्यादीला आपण या परिसरातील भाई असल्याचे सांगत धमकावले. त्याने फिर्यादीला दहा हजार रुपयांचा हप्ता सुरू करण्यास सांगितले. हप्ता न दिल्यास धंदा बंद करण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच, फिर्यादीला मारहाण होऊ नये असे वाटत असेल, तर जास्त शहाणपणा करू नये, अशा स्वरूपाची धमकी आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या धमकीमुळे फिर्यादीकडून फोन पे आणि रोख स्वरूपात एकूण १,७०० रुपये खंडणी म्हणून घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६३३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८(२) आणि ३०८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.