PMRDA इनर रिंग रोडला गती; सहा गावांत जमीन मोजणीच्या तारखा जाहीर

PMRDA इनर रिंग रोडला गती; सहा गावांत जमीन मोजणीच्या तारखा जाहीर

पुणे | ९ ऑक्टोबर २०२६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘इनर रिंग रोड’ प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांमध्ये मोजणीपूर्व ग्रामबैठका घेण्यात येत असून, मुळशीतील चार आणि हवेलीतील दोन गावांमध्ये जमीन मोजणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

प्रस्तावित इनर रिंग रोडची रुंदी ६५ मीटर असून, दोन्ही बाजूंना प्रत्येकी नऊ मीटर रुंदीचे सेवा रस्ते उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जमिनींची मोजणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येत आहे.

कोणत्या गावात कधी होणार जमीन मोजणी?

गाव

मोजणीची तारीख

हिंजवडी

१२ ऑक्टोबर २०२६

जांबे

१३ ऑक्टोबर २०२६

मांजरी खुर्द

१३ ऑक्टोबर २०२६

मारुंजी

१५ ऑक्टोबर २०२६

कोलवडी

१५ ऑक्टोबर २०२६

नांदे

१७ ऑक्टोबर २०२६

मुळशी तालुक्यातील हिंजवडी, जांबे, मारुंजी आणि नांदे येथील ग्रामस्थांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली आहे. नेरे आणि माण येथील ग्रामस्थांशी प्रशासनाचा संवाद सुरू आहे. मावळ तालुक्यातील धामणे येथेही ग्रामबैठक घेऊन नागरिकांच्या मागण्या जाणून घेण्यात आल्या.

हवेली तालुक्यातील कोलवडी येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी केली. भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मोजणी पूर्ण झाल्यानंतर बाधित क्षेत्रातील घरे, झाडे, विहिरी, कूपनलिका आणि पाइपलाइन यांचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

जमिनींचे मूल्यांकन करताना भूसंपादनाच्या अधिसूचनेनंतर मागील तीन वर्षांतील खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती आणि बाजारभाव विचारात घेतला जाणार आहे. कोणत्याही बाधित शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उदमले यांनी दिली.

डिसेंबरअखेर भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

इनर रिंग रोडच्या भूसंपादनाची प्रक्रिया डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करण्याचे पीएमआरडीएचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पीएमआरडीएच्या जमीन व मालमत्ता विभागाच्या सहआयुक्त पूनम मेहता यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories