'पोलीस आयुक्तांची भेट'... उपक्रमात नागरिकांनी पोलिसांशी साधला संवाद
पिंपरी, ता. ११ - नागरीकांशी सकारात्मक व प्रभावी संवाद निर्माण करण्यासाठी पिंपरी-पिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत सुरु करण्यात आलेल्या 'पोलीस आयुक्तांची भेट' हा विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सोमवारी (ता. ९) पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या कार्यालयाच्या शिवनेरी सभागृहात झालेल्या या उपक्रमात ७६ नागरिक सहभागी झाले.
या उपक्रमासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त, सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व पोलीस उप आयुक्त तसेच व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त व सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात नागरिकांनी त्यांच्या विविध अडचणी व सूचना मांडल्या.
सदर उपक्रमास दिघी पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्यातील फिर्यादी परमेश्वर गिराम उपस्थित होते. त्यांनी त्यांचे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पोलीसांनी परत मिळवून दिल्याबद्दल पोलीस आयुक्तांचा सत्कार केला व पोलीसांच्या चांगल्या कामगिरीबाबत कौतुक केले. त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरातील ऑर्थोपेडिक डॉक्टर असोशिएशनचे पदाधिकारी हजर होते त्यांनी त्यांच्या समस्या सांगून सूचना मांडल्या. पोलीसांना मदत करण्याबाबत पुढाकार दर्शविला. 'पोलीस आयुक्तांची भेट' हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
हा उपक्रम दर सोमवारी असाच सुरु राहणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. सदर कार्यक्रमाकरीता पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत जास्त नागरिक, औद्योगिक प्रतिनिधी, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शहरातील अभ्यगतांनी या उपक्रमास हजर राहून आपल्या तक्रारी व सूचना मांडाव्यात असे आवाहन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने केले आले आहे.