लिनिअर गार्डन-पिंपळे सौदागर येथील 'पब्लिक सायकल शेअरिंग' प्रकल्पाचे उद्घाटन
पिंपरी, ता. ९ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटड स्टार्ट-अप संस्था प्री-वाई (Pre-Vai) यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या पिंपळे सौंदागर येथील लिनिअर गार्डन येथील सार्वजनिक सायकल शेअरिंग प्रकल्पाचे उद्घाटन नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि विठ्ठल काटे यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांना कमी अंतरासाठी किफायतशीर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करुन देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.
उद्घाटनप्रसंगी नगरसेविका कुंदा भिसे, अनिता काटे यांच्यासह प्रभारी शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता बापू गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक सायकल शेअरिंग प्रकल्प उभारण्यात आला आहे. असा प्रकल्प उभारण्यासाठी जगभरातील ६६ देशांमधून ८ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रकल्पाची स्थापना निखिल देशमुख आणि प्रत्युष श्रीनिवासन यांनी केली आहे. नागरिकांना कमी अंतरासाठी किफायतशीर, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय उपलब्ध करुन देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, हा राइडशेअर प्रकल्प युरोपियन मानकांनुसार डिझाइन करण्यात आला असून, विशेषतः आयईसी 62196-4 (डीसी चार्जिंग प्रोटोकॉल) या आंतरराष्ट्रीय मानकांचा अवलंब करण्यात आला आहे. तसेच, हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था अंतर्गत या उपक्रमाअंतर्गत समाविष्ट असून, त्याद्वारे प्रकल्पाचे मॉनिटरिंग आणि मार्गदर्शन केले जात आहे. जर्मनीतील जागतिक तज्ज्ञांकडून या स्टार्टअपला मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्याकडून सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. उद्घाटन समारंभाचे संयोजन कनिष्ठ अभियंता अमोल पांचगणे, गिरीश गुठे यांनी केले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी -
- ६६ देशांतील २७५ अर्जांमधून निवडलेला एक जागतिक स्तरावर गौरवलेला उपक्रम
- स्वच्छ, शिस्तबद्ध आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.
- भविष्यातील स्मार्ट मोबिलिटीची नवी ओळख निर्माण करणारा हा प्रकल्प असून, शहराला स्मार्ट, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित वाहतूक व्यवस्था देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
- डॉक-टू-डॉक राइडशेअर प्रणाली
- जिओ-फेन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षित ऑपरेशन
- अत्याधुनिक IoT (Internet of Things) तंत्रज्ञानाचा वापर
- केंद्रीकृत कमांड आणि कंट्रोल प्रणाली
- उच्च दर्जाच्या स्मार्ट बायसिकल्स आणि ई-बायसिकल्सची उपलब्धता
- टचार्जिंग सुविधा