पुणे | १६ ऑक्टोबर २०२६ : पुणे जिल्ह्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) सर्व कामे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांनी दिले आहेत. मतदार नोंदींमधील त्रुटी दूर करणे, मतदारांचे मॅपिंग पूर्ण करणे आणि मतदार यादीतील नावे वगळताना पुराव्यांची काळजीपूर्वक तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एसआयआरच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील मतदार नोंदणी प्रक्रियेतील प्रगती आणि प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला.
शितल तेली-उगले यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामावर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. मतदार नोंदींमधील विसंगती दूर करून सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
एसआयआर कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करणे, त्यांचा निपटारा करणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या तीन टप्प्यांत मतदार यादी निरीक्षकांकडून प्रत्येक जिल्ह्यात भेट देऊन पडताळणी केली जाणार आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामाची माहिती दिली. तसेच १७, १८, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
दरम्यान, पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक २३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीत मतदारांची मते अवैध ठरू नयेत, यासाठी मतदान कसे करावे याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश तेली-उगले यांनी दिले.
मतदानाची योग्य पद्धत समजावून सांगणारी भित्तीपत्रके सर्व मतदान केंद्रांवर लावावीत आणि समाजमाध्यमांतूनही माहिती प्रसारित करावी, असे त्यांनी सांगितले.
तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदार याद्यांमधील दुबार नावे शोधून संबंधित मतदारांना त्याची माहिती द्यावी. मतदाराचे नाव दोन ठिकाणी असल्यास तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबतची लेखी माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सहआयुक्त तथा नोडल अधिकारी संजीव पलांडे, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी ओमप्रकाश दिवटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.