संत तुकारामनगर परिसरात संशयास्पद गिफ्ट बॉक्समध्ये आढळला टेडिबिअर
पिंपरी, ता. १७ - संत तुकारामनगर परिसरात काल शुक्रवारी (ता. १५) रात्री सव्वा आठच्या सुमारास डी वाय पाटील विद्यापीठाच्या राजे राजेश्वरी मुलींच्या वस्तीगृहासमोर संशयास्पद गिफ्ट बॉक्स आढळल्याने परिसरात घबराट पसरुन सर्वांची तारांबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या तपासात या गिफ्ट बॉक्समध्ये मोठा टेडिबिअर असल्याचे समोर आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
काल रात्री सव्वा आठच्या सुमारास डी वाय पाटील विद्यापीठाच्या राजे राजेश्वरी मुलींच्या वस्तीगृहासमोर संशयास्पद गिफ्ट बॉक्स वसतीगृहाच्या सुरक्षा रक्षकाला आढळला. खबरदारीने त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी आले. बॉम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीएस) बोलावण्यात आले. बीडीएस पथकाने बॉक्सची तपासणी केली असता त्यात मोठा टेडिबिअर निघाला.
बीडीएस पथकाने केलेल्या तपासात या बॉक्समधून कोणतीही घातक वस्तू आढळली नाही, असे पोलिसांनी सांगितले. संशयास्पद वस्तूंपासून सावध राहावे, असे आवाहन पोलसांनी केले आहे. या प्रकारामुळे वसतीगृहाच्या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.