पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक : भाजपच्या तयारीचा शंकर जगताप यांनी घेतला आढावा

पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक : भाजपच्या तयारीचा शंकर जगताप यांनी घेतला आढावा

पिंपरी-चिंचवड | १८ ऑक्टोबर २०२६ : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तयारीला गती दिली आहे. मतदारांशी प्रभावी संपर्क, प्रचाराचे सूक्ष्म नियोजन आणि संघटनात्मक समन्वयाच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघांतील भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी एकजुटीने काम करावे, असे आवाहन चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

रविवारी (दि. १८) रहाटणी येथील विमल गार्डन येथे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथप्रमुखांची आढावा व समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन आमदार जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध मतदारसंपर्क मोहीम राबवावी. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि बूथस्तरीय कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने समन्वय ठेवावा. तसेच प्रत्येक स्तरावरील जबाबदाऱ्या निश्चित करून प्रचाराच्या कामाला गती द्यावी, अशा सूचना जगताप यांनी दिल्या.

मायक्रो प्लॅनिंग आणि संघटनात्मक ताकद या निवडणुकीच्या तयारीतील महत्त्वाच्या बाबी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक कार्यकर्त्याचा सक्रिय सहभाग वाढवून दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला प्रभारी तुकाराम बजागे, संदेश भोईर, हरिश्चंद्र भोईर, दक्षिण भारतीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि ज्येष्ठ नेते सचिन साठे यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस, मंडलाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बूथप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories