पिंपरी-चिंचवड | १९ ऑक्टोबर २०२६ : मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर ऑईलच्या डिस्काउंटवरून झालेल्या वादात कर्मचाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास मोशी येथील वाघजाई पेट्रोल पंपावर घडली. या प्रकरणी रेवन राजाराम पांढरे (वय ३३ वर्षे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्याचे काम करत असताना एका स्विफ्ट कारमधून चार व्यक्ती आल्या. त्यापैकी दोन जण खाली उतरले आणि त्यांनी इंजिन ऑईलची पाहणी केली. त्यावेळी फिर्यादीने मॅक कंपनीच्या ऑईलची किंमत प्रतिलिटर ३६९ रुपये असल्याचे सांगितले.
ऑईल महाग असल्याचे सांगून संबंधित व्यक्तींनी सुरुवातीला खरेदी करण्यास नकार दिला. मात्र, काही वेळाने परत येऊन त्यांनी एक लिटर ऑईल घेतले. त्यानंतर डिस्काउंटची मागणी केली. फिर्यादीने डिस्काउंट उपलब्ध नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी यूपीआय स्कॅनरद्वारे ३६९ रुपये भरले.
त्यानंतर एका व्यक्तीने फिर्यादीला शिवीगाळ करत धमकावले. तसेच कमरेला लावलेले पिस्तूल काढून फिर्यादीच्या दिशेने रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पिस्तूल दाखवल्यामुळे पेट्रोल पंपावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थित ग्राहक पळून गेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
यानंतर संबंधित चारही व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून (MH 12 QW 0289) निघून गेल्या.
या प्रकरणी देवानंद ऊर्फ देवा भिमाशंकर जमादार (वय २९), सुलतान इसुफ खान (वय ३२), विलास धाऊ ढेबे (वय २९), काशिनाथ कल्याण काळे (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे तर कुणाल साहेबराव रणवीर (वय २२) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.