शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर नफ्याचे आमिष दाखवून ३५ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १० - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर नफ्याचे आमिष दाखवून तसेच डिमॅट खाते उघडण्यासाठी पैसे घेऊन हिंजवडी येथील ३९ वर्षीय इसमाची ३५ लाख ६ हजार ५३९ रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत घडली आहे. आरोपींवर गुरुवारी (ता. ९) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, फसवणूक झालेले अंकित माथुर (वय ३९ वर्षे, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी राहुल ऊर्फ प्रकाश, मनोज ऊर्फ धर्म आणि राजेश (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाह) आणि काही खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ऑगस्ट २०२५ ते जुलै २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादी माथुर यांना फोन व मेसेज करुन ''शेअर मार्केटमध्ये तुम्हांला चांगला नफा कमवून देतो.'', अशी बतावणी केली. माथुर यांच्या दोन डिमॅट खात्यांचा वापर करुन त्यामध्ये शेअर बाजरांत गुंतवणुक केलेले व माथुर यांनी दिलेले आणखी पैसे अशी एकूण १० लाख ०६ हजार २२९/- इतकी रक्कम घेतली व शेअर बाजारांत गुंतवणुक केल्याचे सांगितले. पुढे, ती रक्कम शेअर बाजारात गुंतविल्यामुळे तोटा झाल्याचे सांगून जास्त नफ्यासाठी माथुर यांना डिमॅट खाते उघडण्यास सांगितले व त्यासाठी माथुर यांच्याकडून त्यांच्या आधार कार्ड व पॅनकार्डची माहीती घेतली. माथुर यांना त्यांच्यानावे डिमॅट खाते उघडल्याचे सांगितले आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये २० लाख ३१०/- रुपये घेतले. याशिवाय, एका आरोपीने माथुर यांना फोन करुन सांगितले की, ''मी स्टॉक ब्रोकींग कंपनी चालवित असून मी त्या कंपनीतून अनेक लोकांना त्यांनी पैसे गुतविल्यानंतर चांगला नफा करुन दिला आहे. तुम्ही पाच लाख रुपये गुंतवल्यिानंतर ते पैसे मी शेअर्स मार्केर्टमध्ये गुंतवुन तुम्हांला दिवसाचे पंचवीस हजार रुपये देईल.'' आरोपीच्या या बोलण्यावर विश्वास ठेवून माथुर यांनी त्याला ५ लाख रुपये पाठवले.
मात्र, या सर्व व्यवहारात माथुर यांना कोणताही नफा मिळाला नाही व त्यांनी आरोपींना गुंतवणूकीसाठी पाठवलेले पैसेही परत मिळाले नाहीत. त्यामुळे फिर्यादी अंकित माथुर यांची ३५ लाख ६ हजार ५३९/-रुपयांची फसवणूक झाली. आरोपींवर भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३१६ (२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपास करत आहेत.