स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण स्मारक परिसरात विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण
पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ - मोशी येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे जगातील सर्वांत उंच शिल्प अर्थात स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण स्मारक परिसरात इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. 'झाडे लावा, झाडे जगवा'....हा संदेश दिला.
पिंपळ, वड, कडुलिंब यांसारख्या वृक्षांची लागवड विद्यार्थ्यांनी केली. झाडे लावतानी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. आमदार महेश लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, ''पर्यावरणाप्रती असलेली जाणीव पाहून मन अभिमानाने भरून आले. हिंदूभूषण स्मारक हे केवळ आपल्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेचे प्रतीक नाही, तर सामाजिक उत्तरदायित्वाची प्रेरणा देणारे केंद्रही आहे. भावी पिढीला हरित आणि समृद्ध वारसा देण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जपण्याचा संकल्प करूया.''
''पर्यावरणाचे रक्षण ही केवळ जबाबदारी नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांसाठी दिलेली सर्वात मौल्यवान भेट आहे. इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, प्राचार्या शिबी राजू, शिक्षकवृंद आणि हिंदूभूषण स्मारक ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या स्तुत्य उपक्रमासाठी मनःपूर्वक अभिनंदन व आभार..'', अशी भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.