तळेगाव दाभाडे | १७ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे परिसरात पार्क केलेल्या दुचाकीच्या उघड्या कप्प्यातून २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. इंद्रायणी कॉलेजजवळील किंग्स कपड्याच्या दुकानासमोरील पार्किंगमध्ये हा प्रकार घडला असून, अज्ञात चोरट्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.५१ ते १२.५७ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या प्रकरणी कृष्णा सुनील दीक्षे (वय १८ ) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, कृष्णा दीक्षे यांनी इंद्रायणी कॉलेजजवळील किंग्स कपड्याच्या दुकानासमोरील पार्किंगमध्ये आपली ॲक्सेस १२५ दुचाकी (एमएच-१४-जेडब्ल्यू-०६६२) पार्क केली होती.
या दुचाकीच्या समोरील उघड्या कप्प्यात त्यांनी निळसर रंगाचा आयफोन १७ कंपनीचा मोबाईल ठेवला होता. या मोबाईलची किंमत २५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणीतरी अज्ञात चोरट्याने दुचाकीच्या उघड्या कप्प्यातील मोबाईल फिर्यादीच्या संमतीशिवाय लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८०/२०२६ दाखल करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.