चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा

चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कमधील तारांगण सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत कलाकार, साहित्यिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी दोन्ही कलाकारांच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते. यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर, लेखक प्रभाकर ओव्हाळ, काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, निहाल पानसरे,  आणि साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गिरीश प्रभुणे यांनी मधू कांबीकर यांनी, कोल्हाटी समाजासाठी केलेल्या कार्याचे स्मरण केले. कोल्हाटी समाजातील मुलींनी नाचगाणी सोडून शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी मी उभारत असलेल्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी केलेल्या २५ हजार रुपयांच्या मदतीमुळेच सामाजिक समरसतेचा प्रवास पुढे निर्धोकपणे पार पडला, अशी आठवण प्रभुणे यांनी यावेळी व्यक्त केली तर भाऊसाहेब भोईर यांनी कलाकार कधीच आपल्या आठवणींतून दूर जात नाही, असे सांगत त्यांच्या कलेचा वारसा कायम जिवंत राहत असल्याची भावना व्यक्त केली. 

ज्येष्ठ कलावंत वसंत अवसरीकर यांनी, मधू कांबीकर यांच्यासोबत नाटक आणि चित्रपटांमध्ये काम करतानाचे अनुभव सांगत  मधुताई आणि ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी नाना पाटेकर यांच्या साधेपणाचा अनुभव सांगितला. पत्रकार दादाराव आढाव यांनी मधू कांबीकर यांच्यासोबतच्या शालेय जीवनातील आठवणी मांडत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

पत्रकार अश्विनी सातव यांनी दोन्ही कलाकारांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात माणुसकी जपण्याचे आवाहन केले. उपस्थितांनी सांगितलेल्या आठवणींमुळे सभागृहातील वातावरण भावुक झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार गोविंद वाकडे यांनी केले, तर पत्रकार व लेखक विजय जगताप यांनी प्रास्ताविक केले. अविनाश कांबीकर यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभेचा समारोप केला.

या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णू मांजरे,गणेश दिघे व नितीन भोगले यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories