मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळून तिघांचा मृत्यू
पिंपरी, ता. ६ जुलै २०२६ - मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील पाटण गावात घरांवर दरड कोसळल्याने सोमवारी (ता. ६) एकाच कुटुंबातील तिघांचा ढिगाऱ्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत नंदू दत्तू तिकोने (वय 55), अनिता नंदू तिकोने (वय 50) आणि ज्ञानेश्वर नंदू तिकोने (वय 26) यांचा मृत्यू झाला. खबरदारी घेत अनेक कुटुंबांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपली घरे तात्पुरती रिकामी केली असून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
घटनेची माहिती मिळताच सकाळपासून युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफची टीम, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, पाटण ग्रामस्थ आणि स्थानिक स्वयंसेवक यांनी घटनास्थळी धाव घेत मलबा हटविण्याचे काम सुरू केले. प्रशासकीय यंत्रणाही तातडीने घटनास्थळी दाखल झाली. उपविभागीय अधिकारी (मावळ-मुळशी), सुरेंद्र नवले तहसीलदार (मावळ), विक्रम देशमुख लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून मदतकार्याचे व्यवस्थापन केले.
दरम्यान, सुनील शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यांनी प्रशासनाला बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. सततच्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यात दरडी कोसळण्याचा धोका वाढला असून डोंगरपायथ्याशी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------