शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप; सांगवी पोलिसांत 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा

शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप; सांगवी पोलिसांत 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा

पिंपळे गुरव : खासगी रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा झाल्याने 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची वैद्यकीय तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करण्यात आली. समितीचा अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर सांगवी पोलिसांनी उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि भूलतज्ज्ञाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

निर्मला बबन काटखडे (वय 61, व्यवसाय—गृहिणी, रा. स्वामी समर्थ कॉलनी, इंद्रायणी पार्क, गायकवाड वस्ती, मोशी, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून डॉ. मधू काशीराव पठाण (वय 38, रा. फाईव्ह गार्डन सोसायटी, रहाटणी, पुणे) आणि भूलतज्ज्ञ डॉ. अभिषेक विद्याधर लोणीकर (वय 36, रा. स्वप्नशील सोसायटी, कोथरूड, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे पती बबन शिवराम काटखडे (वय 60, रा. मोशी, पुणे) यांच्यावर पिंपळे गुरवमधील सुश्रुत सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचार आणि शस्त्रक्रियेची जबाबदारी संबंधित डॉक्टरांकडे होती. या प्रक्रियेदरम्यान झालेल्या कथित हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे बबन काटखडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

रुग्णाच्या मृत्यूस डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याची चौकशी करण्यासाठी सांगवी पोलिसांनी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडे पाठवली होती. उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून प्रथमदर्शनी निष्काळजीपणा झाल्याचा अभिप्राय तज्ज्ञ समितीने दिल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टरांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली. उपचारांची कागदपत्रे, शस्त्रक्रियेचा तपशील, औषधोपचार आणि वैद्यकीय प्रक्रियेचा पुढील तपास केला जात आहे.

याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 492/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories