ट्रेड एक्स प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीच्या आमिषाने नोकरदाराची 42.43 लाखांची ऑनलाइन फसवणूक

ट्रेड एक्स प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीच्या आमिषाने नोकरदाराची 42.43 लाखांची ऑनलाइन फसवणूक

वाकड : ट्रेड एक्स नावाच्या कथित ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास सांगून एका नोकरदाराची 42 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे बनावट आर्थिक व्यवहार आणि नफा दाखवण्यात आला. मात्र, गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर खाते शून्य झाल्याचे दिसून आले.

सुनील अंतु दवंगे (वय 29, रा. दुर्गा पीजी, इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ, वाकड गावठाण, पुणे; मूळ रा. मळेगाव थडी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला. ट्रेड एक्स नावाच्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची माहिती देऊन त्यावर गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा मिळेल, असे सांगण्यात आले. सुरुवातीला फिर्यादीने 24 हजार रुपये गुंतवले.

प्लॅटफॉर्मवर गुंतवणुकीवर नफा मिळत असल्याचे दाखवण्यात आल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आणखी रक्कम जमा केली. अशा प्रकारे फिर्यादीने एकूण 42 लाख 43 हजार रुपये संबंधित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवल्याचे तक्रारीत नमूद आहे.

गुंतवणुकीची रक्कम आणि कथित नफा परत मिळवण्यासाठी फिर्यादीने प्रयत्न केला असता, प्लॅटफॉर्मवर विविध बनावट व्यवहार दाखवण्यात आले. त्यानंतर खात्यातील गुंतवणूक शून्य झाल्याचे दिसले. संशय आल्याने फिर्यादीने संबंधित कंपनीची माहिती सेबीच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासली. मात्र, ट्रेड एक्स नावाची कंपनी नोंदणीकृत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. संबंधित मोबाइल क्रमांक, बँक खाती आणि ऑनलाइन व्यवहारांचा तांत्रिक तपास केला जात आहे.

याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 494/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories