‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशींची काव्यमैफल; मराठी भाषा सप्ताहात रसिकांची दाद

‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशींची काव्यमैफल; मराठी भाषा सप्ताहात रसिकांची दाद

पिंपरी | ९ ऑक्टोबर २०२६ : कधी प्रेमाच्या तरल भावना, कधी मिश्कील शब्दांतून उमटणारा हास्याचा खळखळाट, तर कधी आईच्या आठवणींनी दाटून येणारी हुरहूर... अशा विविध भावछटांनी सजलेल्या ‘द मनमौजी’ या काव्यमैफलीने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रसिकांची मने जिंकली. प्रसिद्ध कवी आणि गीतकार वैभव जोशी यांच्या कविता, गझला आणि मनमोकळ्या संवादाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी विविध साहित्यिक आणि सांगीतिक कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशी यांनी प्रेम, सौंदर्य, निसर्ग, मानवी स्वभाव आणि आईविषयीच्या भावना आपल्या कवितांमधून उलगडल्या. त्यांच्या मिश्कील रचनांनी प्रेक्षागृहात हास्याची कारंजी फुलवली. ‘मन तुझे जलतरंग…’ या लोकप्रिय रचनेतून प्रेमाच्या नाजूक भावविश्वाचा अनुभव रसिकांना मिळाला.

आईविषयीच्या भावस्पर्शी कवितेने मात्र वातावरण हळवे झाले. आईचे आयुष्यातील स्थान आणि तिच्या सहवासाचे महत्त्व व्यक्त करणाऱ्या रचनेला उपस्थितांनी विशेष दाद दिली. कविता, गझल आणि संवाद यांच्या सहज संगमामुळे ही मैफल रसिकांसाठी संस्मरणीय ठरली.

‘चांगभलं’मधून मराठी लोकसंस्कृतीचा जागर

याच प्रेक्षागृहात झालेल्या ‘चांगभलं’ या सांगीतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि संगीताचा समृद्ध वारसा उलगडण्यात आला. पारंपरिक संगीताच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

‘गझल आख्यान’मधून गझलेच्या विश्वाची ओळख

‘गझल आख्यान’ अर्थात ‘मुजुमदार सरांचा क्लास’ या कार्यक्रमातून गझलेची रचनापद्धती, शब्दांचे सौंदर्य, लय आणि सादरीकरणातील बारकावे रसिकांसमोर मांडण्यात आले. साहित्य आणि संगीत यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

‘म...मराठीचा’मध्ये मराठी गीतांचा जागर

मराठी संगीताचे विविध पैलू उलगडणाऱ्या ‘म...मराठीचा’ या सांगीतिक कार्यक्रमात लोकप्रिय मराठी गीतांचे सादरीकरण करण्यात आले. भावस्पर्शी गीते आणि सुरेल गायनाने प्रेक्षकांना मराठी संगीताच्या समृद्ध परंपरेची अनुभूती दिली.

‘सूर तरुणाईचा… ध्यास मराठीचा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने ‘सूर तरुणाईचा… ध्यास मराठीचा’ या कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. गायक विनल देशमुख, गायिका वर्षा एखंडे आणि ‘इंडियन आयडल मराठी’ फेम अश्विनी मिटे यांच्या सुरेल गायनाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या विविध कार्यक्रमांमधून कविता, गझल, लोकसंगीत आणि मराठी चित्रपटगीतांचा आस्वाद नागरिकांना घेता आला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories