देहूरोड | ९ ऑक्टोबर २०२६ : किवळे परिसरातील कृष्णा चौकाजवळ भरधाव ट्रकने पोलीस हवालदाराला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात पोलीस हवालदाराच्या डाव्या पायाचा घोटा फ्रॅक्चर झाला असून, निष्काळजीपणे ट्रक चालवणाऱ्या चालकाविरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.१० वाजण्याच्या सुमारास कृष्णा चौक, बापदेव महाराज उड्डाणपुलाखाली, मावळ पुतळा परिसर, किवळे येथे हा अपघात घडला.
या प्रकरणी विजय भीमराव जगताप (वय ५०, पोलीस शिपाई, नेमणूक देहूरोड वाहतूक विभाग ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, पोलीस हवालदार दत्तात्रय शेडगे (बक्कल क्रमांक ३११९) हे कृष्णा हॉटेलकडून मुकाई चौक बसस्थानकाकडे जात असताना आरोपी चालकाने त्यांच्या दिशेने ट्रक आणला.
या प्रकरणी लक्ष्मण शिवाजी ताकभाते (वय ४२, रा. गोकुळनगर, कात्रज, पुणे; मूळ रा. मोहोळ, जि. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक MH 12 VF 1553 भरधाव वेगाने, बेदरकारपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवल्याचा आरोप आहे. ट्रकने दत्तात्रय शेडगे यांना मागून धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले. त्यानंतर ट्रकच्या मागील बाजूच्या उजवीकडील चाकाखाली त्यांचा डावा पाय आल्याने पायाचा घोटा फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.