वाल्हेकरवाडीत पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकींना आग, एक गंभीर जखमी
पिंपरी, ता. २० जुलै २०२६ - वाल्हेकरवाडी परिसरात इमारतीच्या आवारात चार्जिंगला लावलेल्या दोन इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागली आणि यात दोन मजली इमारतही जळाली आहे. ही घटना आज, सोमवारी (ता. २०) दगडोबा चौकातील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये सकाळी घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमक दलाचे बंब तिथे दाखल झाले आहे. जवानांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. थेरगाव अग्निशमन केंद्राचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर प्राधिकरण आणि पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्राच्या पथकांनीही मदतकार्य सुरू केले. तीन अग्निशमन पथकांनी संयुक्तपणे आग आटोक्यात आणत बचावकार्य राबविले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्किंगमध्ये चार्जिंगला दोन इलेक्ट्रिक बाईक लावण्यात आल्या होत्या. ओव्हर चार्जिंगमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. निवासी इमारतीला एवढी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. आगीच्या ज्वाला इमारतीच्या वरपर्यंत पोहोचल्या आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.