गुरुवारी झालेल्या पावसाने खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात थोडीशी वाढ
पुणे, ता. ३ - खडकवासला धरण परिसरात गुरुवारी (ता. २) जोरदार अवकाळी पाऊस बरसला. अडीच तासांत १०४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा थोडा वाढला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.
पुणे जिल्ह्यात गेले दोन दिवस शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात मोठा पाऊस झाला. मात्र, लगत असलेल्या पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात तुरळक पाऊस झाला आहे. खडकवासला धरण परिसरात झालेल्या पावसामुळे जलसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. चारही धरणांत मिळून १३.८९ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ४७.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत एक टीएमसी जादा पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले आहे.
शनिवारपर्यंत पावसाची शक्यता....
जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारपर्यंत (ता. ४) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात, पशुधनाची सुरक्षित व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचित केले आहे.