एमआयडीसी परिसरात अजितदादांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार - संदीप बेलसरे
पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अजितदादांना श्रद्धांजली
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवडमधील लघुउद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी अजितदादांनी कायम सकारात्मक भूमिका घेतली. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक समस्या, मिळकत कर, संघटनेला जागा देणे, लघु उद्योजकांचे पुनर्वसन करणे हे प्रश्न त्यांनी सोडवले. अजिदादांच्या या सर्वांना समाजकार्याची प्रेरणा देणाऱ्या स्मृती कायम सोबत ठेवाव्यात यासाठी पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसरात अजिदादांचे स्मारक उभारावे आणि त्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या माध्यमातून महापालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेच्या वतीने सोमवारी मोशी प्राधिकरण सेक्टर-४ येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, प्रसिद्धी प्रमुख विजय खळदकर, संचालक संजय सातव, विनोद मित्तल, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक तात्या सपकाळ, सुरेश म्हेत्रे, संजय भोसले, माणिक पडवळ, बशीरभाई तरसगार हे लघुद्योजक उपस्थित होते. सर्वांनी अजितदादांना आदरांजली अर्पण करुन त्यांच्या आठवणी सांगितल्या.

सुरेश म्हेत्रे म्हणाले, ''पिंपरी चिंचवड मधील लघु उद्योजकांच्या दृष्टीने अजितदादा पवार हे लोहपुरुष होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी येथे एखादा प्रकल्प सुरू करावा.'' संजय आहेर म्हणाले, ''पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना बरोबरच राज्यातील सर्वच लघुउद्योजकांना अजितदादा पवार नेहमी पाठबळ देत होते. पिंपरी-चिंचवड एमआयडीसीला अजित नगर असे नाव देण्यात यावे यासाठी संघटनेच्या वतीने प्रयत्न करावेत.'' ''सर्व लहान थोरांच्या मनात घर केलेला आपला माणूस गमावल्याची भावना आहे.'' अशी भावना हर्षल थोरवे यांनी व्यक्त केली.