चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईतांना नाशिकमधून अटक, गुन्हे शाखा युनिट १ ची कामगिरी
पिंपरी, ता. ५ - बाहेरच्या जिल्हयातून येऊन पिंपरी-चिंचवडमध्ये मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट - १ च्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. यासाठी, पोलिसांनी तब्बल ९५ ते १०० तासांहून अधिक काळ व ५०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून गुन्ह्यांची उकल केली आहे.
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हददीत वाढत्या चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त डॉ. शिवाजी पवार व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे खास तपास पथक चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तैनात केले होते.
सदर पथकांतील अंमलदार पोलीस हवालदार महादेव जावळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तब्बल ९५ ते १०० तासांचे वर व ५०० पेक्षा जास्त कॅमे-यांची पडताळणी करुन गुन्हेगारांचा पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामिण हद्दीतील प्रवासाचा बारकाईने माग काढला. या तपासात आरोपी हे मुख्य रस्ता न वापरता वारंवार रस्ते बदलून आड मार्गाने जात असल्याचे आढळले. पोलिसांचे पथक गंगापूर-नाशिक येथे पोचले आरोपी अक्षय सुनिल बोरकर (वय २१ वर्ष, रा. श्रमिक नगर, सातपुर, नाशिक) व प्रशांत संतविजय यादव (वय १९ वर्ष, रा - शिवाजी नगर, गंगापुर, नाशिक) यांना ताब्यात घेतले.
तपासामध्ये आरोपींनी संत तुकारामनगर, चिखलीस्टेशन परिसरातून मोटार सायकलवर फिरुन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने खेचून चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. चोरी केलेले १०० टक्के सोन्याचे दागिने त्यांच्याकडून जप्त केले. एकुण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघांकडून ताब्यात घेतला आहे. अटक केलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर नाशिक ग्रामिण हद्दीत विविध पोलीस ठाण्यात २५ पेक्षा जास्त साखळीचोरी व अन्य चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
- आरोपींकडून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात केलेले व उघडकिस आणलेले साखळीचोरीचे गुन्हे खालील प्रमाणे -
१) संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक १६/२०२५ भान्यासं कलम ३०९ (४),३(५)
२) चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्रमांक १९/२०२५ भान्यासं कलम ३०९ (४), ३(५)
- सदरची कारवाई पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट - १ चे प्रभारी अधिकारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलिस उप निरीक्षक कर्मराज गावडे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, पोलिस हवालदार महादेव जावळे, जयवंत राऊत, देवा राऊत, शिवराम भोपे, अजय डगळे, शेळकंदे, पोलिस शिपाई संदेश देशमुख, लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, चिखलकर खेडकर यांनी केली आहे.
--------------------------------------------------------------------------------------------