काळेवाडी | २९ ऑगस्ट २०२६ : कोणताही ओटीपी अथवा बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर केलेली नसताना व्यावसायिकाच्या कार्यालयीन खात्यातून तब्बल ७ लाख ७ हजार ५६८ रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात सायबर चोरट्यांनी ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून ही रक्कम लंपास केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मलिंद राधाराम आठवले (वय ४१, मूळ रा. जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ते २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत रहाटणी परिसरात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कार्यालयाच्या बँक खात्यात प्रवीण शिंदे यांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायाशी संबंधित २० लाख ५४ हजार ३२५ रुपये शिल्लक होते. या खात्याशी संबंधित कोणताही ओटीपी, पासवर्ड अथवा अन्य गोपनीय माहिती फिर्यादीने कोणालाही दिली नव्हती.
तरीही अज्ञात आरोपींनी ऑनलाइन माध्यमातून खात्यात अनधिकृत प्रवेश मिळवला. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया येथील खात्यांचा वापर करून व्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या व्यवहारांपैकी १ लाख ४९ हजार ५०० रुपये फिर्यादीच्या खात्यात परत जमा झाले आहेत.
मात्र, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कार्यालयीन खात्यातून एकूण ७ लाख ७ हजार ५६८ रुपये परस्पर काढून अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७८/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित कलमांनुसार अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.