खाकी वर्दीचं बाळगलेलं स्वप्न अर्धवट राहिलं, पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये धावताना युवकाचा मृत्यू
Mar 28 2026
29
खाकी वर्दीचं स्वप्न बाळगलेलं स्वप्न अर्धवट राहिलं, पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये धावताना युवकाचा मृत्यू
शिवाजीनगर पोलिस मुख्यालायाच्या मैदानावरील घटना
पुणे, ता. २८ - खाकी वर्दीचं स्वप्न बाळगून असंख्य तरुण-तरुणी पोलिस भरतीची तयारी करतात. बुलढाण्यातील एका युवकानेही पोलिस बनण्याचं ध्येय समोर ठेवून मेहनत केली. पोलिस भरतीसाठी तो पुण्यात आला. शनिवारी (ता. २८) शिवाजीनगरमधील पोलिस मुख्यालयात भरती प्रक्रीयेतील मैदानी चाचणीमध्ये धावताना त्याला एकाएकी अपस्माराचा झटका आला आणि तो पडला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले पण उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या युवकाचं पोलिस बनण्याचं स्वप्न अर्धवट राहिलं.
पुरुषोत्तम बारकुल (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा गावचा आहे. शिवाजीनगर पोलिस मुख्यालायाच्या मैदानावर पोलिस भरती प्रकीयेतील मैदानी चाचणी सुरु आहे. शनिवारी सकाळी १६०० मीटर धावण्याच्या चाचणीत पुरुषोत्तमने मैदानाला दोन फेऱ्या मारल्या. तिसऱ्या फेरीत अचानक त्याला अपस्माराचा झटका आल व तो मैदानावरच कोसळला.
ही घटना उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजल्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. त्याच्या हृदयाचे ठोके मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याला तातडीने ससून रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच ससू्नच्या डॉक्टरांनी तो मरण पावल्याचे सांगितले. पुढे, पुरुषोत्तमच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
पुरुषोत्तमच्या अशा निधनाने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले. पुरुषोत्तमचे खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण झाले नाही, ही गोष्ट उमेदवारांच्या मनाला चटका लावून गेली आहे.