निगडी | २९ ऑगस्ट २०२६ : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुमचे नाव आले असून तुमच्यावर कारवाई केली जाईल, अशी भीती दाखवत सायबर चोरट्यांनी निगडीतील ५२ वर्षीय व्यक्तीची ११ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. बनावट पोलीस अधिकारी बनून आरोपींनी चौकशी आणि अटकेची धमकी देत फिर्यादीकडून रक्कम हस्तांतरित करून घेतली.
याप्रकरणी दीपक काशिनाथ पंडित (वय ५२, रा. सिंधुनगर, निगडी प्राधिकरण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क साधून स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावरून २४ महिलांना त्रासदायक संदेश आणि अश्लील जाहिराती पाठविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात फिर्यादीचे नाव आणि बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगत त्यांना अटकेची भीती दाखवली.
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचे बनावट पीडीएफ कागदपत्र पाठवले. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली बँक खात्याची माहिती घेतली आणि खात्यातील रक्कम पडताळणीसाठी पाठवावी लागेल, असे सांगितले.
अटकेच्या भीतीमुळे फिर्यादीने आरोपींनी दिलेल्या खात्यावर एकूण ११ लाख ९० हजार रुपये जमा केले. रक्कम परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६१६/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत पुढील तपास सुरू आहे.