माफी मागण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावले; कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

माफी मागण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावले; कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

काळेवाडी | २९ ऑगस्ट २०२६ : माफी मागण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय तरुणाला पाचपीर चौकात बोलावून सहा जणांनी संगनमताने मारहाण केली. यावेळी एका आरोपीने कोयत्याने वार करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

याप्रकरणी सुंदरम लालचंद यादव (वय २५, व्यवसाय–लोन व्हेरिफिकेशन, रा. रहाटणी) यांनी काळेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशु मॅडम ऊर्फ ऐश्वर्या सुतार, ओंकार, कांतीलाल, सोहम, निखिल आणि राजू यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी क्रमांक एकला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका लॉजिस्टिक फूड डिलिव्हरी कंपनीत फिल्ड मॅनेजर म्हणून काम करतात. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला फोन केला. आशु मॅडमची माफी मागण्यासाठी पाचपीर चौकात येण्यास सांगण्यात आले.

फिर्यादी तेथे पोहोचल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर एका आरोपीने कमरेला लपवलेला कोयता काढून फिर्यादीच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि उजव्या कानाजवळ वार केले. इतर आरोपींनी कमरेच्या पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories