बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन सदनिकांची विक्री; व्यावसायिकाची ५५ लाखांची फसवणूक

बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन सदनिकांची विक्री; व्यावसायिकाची ५५ लाखांची फसवणूक

बावधन | २९ ऑगस्ट २०२६ : गृहप्रकल्पातील तीन सदनिकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री करून एका व्यावसायिकाची ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुखत्यारपत्र आणि जुन्या दस्तऐवजांचा गैरवापर करून खरेदीखत नोंदवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी रामनाथ विष्णू लवांडे (वय ४५, व्यवसाय, रा. पाशाण) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनिल व्ही. नावंडे, संजय विठ्ठल वेदक आणि वृषाली कल्याणगिरी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने ५ सप्टेंबर २०२४ रोजी ब्रह्मचैतन्य असोसिएट्स या फर्मला मुखत्यारपत्र दिले होते. याची माहिती असलेल्या आरोपींनी संगनमत करून गृहप्रकल्पाच्या सी-विंगमधील सदनिका क्रमांक १११, ११२ आणि ११४ यांच्याशी संबंधित कागदपत्रांचा गैरवापर केला.

आरोपींनी खरेदीखतासाठी आवश्यक नोंदणी कागदपत्रांमध्ये फेरफार करून खरी माहिती लपवली. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि संबंधित गृहप्रकल्प बळकावण्याच्या उद्देशाने जुन्या फर्मचे दस्तऐवज वापरल्याचा आरोप आहे.

त्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी हवेली क्रमांक चार येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक ४५४४/२०२६, ४५४५/२०२६ आणि ४५४६/२०२६ नोंदवून तीन सदनिकांची महिला आरोपीच्या नावे विक्री करण्यात आली. या व्यवहारातून फिर्यादीची ५५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories