पुनावळेत कारमधून 50 लाखांची चोरी; 8 तासांत दोघांना अटक, संपूर्ण रक्कम हस्तगत

पुनावळेत कारमधून 50 लाखांची चोरी; 8 तासांत दोघांना अटक, संपूर्ण रक्कम हस्तगत

पिंपरी-चिंचवड : पुनावळे येथील हॉटेलसमोर पार्क केलेल्या कारमधून ₹50 लाखांची रोकड चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 8 तासांत 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट-2, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

प्रसाद शिवाजी बनकर (वय 29, रा. चिंबळी, ता. खेड) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय 30, रा. निघोजे, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बनकर हा सुपरवायझर असून, बेंडाले बांधकाम व्यवसायात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरील सर्व्हिस रोडवर फिर्यादीची कार पार्क करण्यात आली होती. कारमध्ये ₹50 लाखांची रोकड असलेली बॅग ठेवली होती. बनावट चावीच्या साहाय्याने कारच्या दरवाजाचे लॉक उघडून ही बॅग चोरण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 476/2026 नोंदविण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना तपासाचे निर्देश दिले. त्यानुसार विविध पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक व्यक्ती कार उघडून पैशांची बॅग घेऊन जाताना दिसल्याने तपासाला दिशा मिळाली.

तपासादरम्यान फिर्यादीसोबत मुंबईला पैसे आणण्यासाठी गेलेल्या 2 व्यक्तींपैकी चारुदत्त बेंडाले याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने मित्राला कारची बनावट चावी दिली होती. तसेच कारमध्ये ₹50 लाख असल्याची माहिती देऊन चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या माहितीनुसार पोलिसांनी प्रसाद बनकर याला चिंबळी येथून ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून संपूर्ण ₹50 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सीसीटीव्ही तपासासह तांत्रिक विश्लेषण विभागाचीही मदत घेण्यात आली.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त रोहिदास पवार व प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, राहुल खिळे आणि संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories