स्पा चालकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; 10 हजार स्वीकारताना पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात

स्पा चालकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; 10 हजार स्वीकारताना पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटर चालवायचे असेल तर ₹50 हजार द्यावेत, अन्यथा वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध करून व्यवसाय बंद करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पत्रकाराला खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले. रहाटणीतील जगताप डेअरी चौकात ₹10 हजारांची रक्कम स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून रोख रक्कम, मोबाईल, ओळखपत्र आणि कार असा एकूण ₹2,77,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अक्षय अरुण वाघमारे (वय 35, रा. पाडळेवस्ती, खडकी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो ‘साप्ताहिक वंचित सामना’चा पत्रकार आहे. याप्रकरणी स्पा सेंटरचे चालक साजिद मन्सुर पेंढारी (वय 27, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेंढारी यांनी खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन तक्रार केली. रहाटणीतील ‘अर्थ स्पा सेंटर’बाबत आरोपीने डायल 112 वर फोन करून पोलिसांना खोटी माहिती दिली आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ₹50 हजारांची खंडणी मागण्यात आल्याचे फिर्यादीने सांगितले. पैसे न दिल्यास स्पा सेंटरबाबत वर्तमानपत्रात बातम्या छापून व्यवसाय बंद करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

प्राप्त तक्रारीची खंडणीविरोधी पथकाने खातरजमा केली. आरोपी वारंवार फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून पैशांची मागणी करीत असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पथकाने आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला.

रहाटणीतील साई कॉर्नर, जगताप डेअरी चौक येथे आरोपीला 2 पंचांसमक्ष ₹10 हजार स्वीकारताना पकडण्यात आले. त्याच्याकडून रोख रकमेसह 1 मोबाईल, ‘वंचित सामना’चे ओळखपत्र आणि होंडा कंपनीची 1 कार जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹2,77,500 असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

फिर्यादीच्या तक्रारीवरून काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 622/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2) आणि 308(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या पथकाने केली. रमेश गायकवाड, अभिमन्यू बनसोडे, सुनील कानगुडे, प्रदीप पोटे, किरण जाधव, प्रदीप गोडांबे, रमेश मावसकर, किशोर कांबळे आणि दादाभाऊ साबळे यांचा पथकात सहभाग होता.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories