सांगवी | २९ ऑगस्ट २०२६ : 2-बीएचके फ्लॅट विक्रीचे आश्वासन देऊन एका व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये टोकन म्हणून स्वीकारले. मात्र, ठरल्याप्रमाणे फ्लॅटची विक्री न करता आणि घेतलेली रक्कमही परत न देता अपहार केल्याचा प्रकार पिंपळे गुरव येथे समोर आला आहे. याप्रकरणी पती-पत्नीविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अशोक नारायण भुवड (वय ५५, व्यवसाय, सध्या रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद रेशम रत्नम आणि त्याची पत्नी सुवर्णा विनोद रत्नम, दोघेही रा. चांगभले हाइट्स, साई कन्स्ट्रक्शनच्या पाठीमागे, पिंपळे गुरव, यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या मालकीचा चांगभले हाइट्समधील फ्लॅट क्रमांक २०२ हा टू-बीएचके फ्लॅट फिर्यादीला विकण्याची तयारी दर्शवली. या व्यवहारासाठी फिर्यादीकडून दोन लाख रुपये टोकन रक्कम स्वीकारण्यात आली.
आरोपींनी दोन महिन्यांच्या आत फ्लॅट विक्रीचा संपूर्ण व्यवहार पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निर्धारित कालावधी संपल्यानंतरही त्यांनी फ्लॅटची विक्री केली नाही. फिर्यादीने व्यवहाराबाबत वारंवार विचारणा करून आपली टोकन रक्कम परत मागितली; परंतु आरोपींनी ती रक्कमही परत केली नाही.
आरोपींनी संगनमत करून विश्वास संपादन केला आणि दोन लाख रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ नोंदवण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.