मद्यधुंद कंटेनर चालकाची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

मद्यधुंद कंटेनर चालकाची दुचाकीला धडक; तरुण गंभीर जखमी

पिंपरी | २९ ऑगस्ट २०२६ : मद्यधुंद अवस्थेत भरधाव कंटेनर चालवणाऱ्या चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने २८ वर्षीय सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. अपघातात तरुणाच्या ओठाला, हनुवटीला, दोन्ही गुडघ्यांना आणि हातांना दुखापत झाली, तर त्याचा अर्धा दातही तुटला. ही घटना गुरुवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास नेहरूनगरमधील संतोषी माता  चौकात घडली.

याप्रकरणी रोहन तुकाराम शिंदे (वय २८, रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून कंटेनरचालक दीपकसिंग हनुमंतसिंग (वय ३६, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरोधात संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटीस बजावून सोडण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या होंडा शाईन दुचाकी वरून एकतानगरकडून संत तुकारामनगरच्या दिशेने जात होते. संतोषी माता चौकात पोहोचले असता पाठीमागून आलेल्या कंटेनर ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

कंटेनरचालकाने दारूच्या नशेत, भरधाव वेगाने आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. धडकेमुळे दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळला आणि गंभीर जखमी झाला. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे.

याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८८/२०२६ नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories