महापालिका कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरु - अभिषेक बारणे
महपाालिकेच्या पहिल्या स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मान्यता
पिंपरी, ता. ५ - ''महापालिकेच्या आवश्यक ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. महापालिकेवर असलेले कर्ज कमी करुन महापालिका कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरु आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी उत्पन्न वाढीवर भर दिला जाईल. '' असल्याचे स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी बुधवारी (ता. ४) पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनामध्ये बुधवारी स्थायी समितीची बैठक झाली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सभापती अभिषेक बारणे अधिक माहिती दिली.
या बैठकीत, महापालिकेच्या वतीने “मराठी भाषा गौरव दिना”निमित्त २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमासाठी यामध्ये कलाकार, वक्ते मानधन, सांस्कृतिक कार्यक्रम असा एकूण खर्च र. रु. ७,५०,०००/- इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या मुख्य लेखा विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रजा मंजुरी कामी सादर केलेल्या विनंती अर्जाला मंजुरी देण्यात आली. शहरात सुरु असलेल्या बांधकामांच्या ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत सभापती बारणे यांनी कार्यवाही केली. शहरात धुळीचे प्रमाण वाढू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी बांधकाम सुरक्षा तपासण्यासाठी दोन विशेष पथके तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या ठेवींबाबत भाष्य करताना बारणे म्हणाले की, ''महापालिकेच्या आवश्यक ठेवींमध्ये कोणतीही घट झालेली नाही. त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. तरीही, आरोपांची सविस्तर माहिती घेऊन योग्य ती चौकशी केली जाईल. अत्यावश्यक नसलेली नवीन कामे तूर्तास थांबवून केवळ गरजेच्या कामांनाच प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या सभेत प्रलंबित राहिलेल्या विषयांवर आणि विविध उपसूचनांवर पुढील सभेत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.''
महापालिकेच्या आर्थिक नियोजनाबाबत बोलताना अभिषेक बारणे म्हणाले, ''सध्या पालिकेवर दायित्व अधिक आहे. नवीन कामांपेक्षा आधीचे प्रकल्प पूर्ण करणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवणे हे आमचे प्राधान्य आहे. वाकडसह उपनगरांतील कर संकलन वाढवणे आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून महसुलात भर टाकणे यावर आम्ही भर देत आहोत. निधी वाढल्यास शहराच्या वैभवात भर घालणारी कामे वेगाने होतील. महापालिकेवर असलेले कर्ज कमी करून शहर कर्जमुक्त करण्याच्या दिशेने सकारात्मक प्रयत्न सुरु आहे. ''