आमदार महेश लांडगे यांच्या अहिल्यानगरमधील भाषणाविरोधात पोलिसांत तक्रार 

पिंपरी, ता. ५ -  अहिल्यानगर येथे बुधवारी (ता. ४) झालेल्या एका सभेत पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या कथित धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या व द्वेषपूर्ण भाषणाविरोधात पिंपरी-चिंचवड येथील पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या भाषणामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगलसदृश्य परिस्थिती उद्भवू शकते, असे तक्रारीत म्हटले आहे.

हिंदू एकता संघटनेच्या वतीने आयोजित सभेत भाषण करताना आमदार महेश लांडगे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील अशी विधाने केली. यावेळी त्यांनी जातीवाचक व आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याने समाजामध्ये आकस व द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. सदर वक्तव्ये ही थेट 'हेट स्पीच'या कक्षेत येत आहेत, असा दावाही तक्रारीत केला आहे. 

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण भाषणांबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी पोलिसांना स्वतःहून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसल्याने संबंधित आमदारावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर भाषणाचा व्हिडिओ मोबाईलवर पाहिल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीसोबत संबंधित भाषणाचा व्हॉट्सॲप व्हिडिओ व भाषणाची ट्रान्स्क्रिप्टही जोडण्यात आली आहे. पोलीसांनी तक्रार नोंदवून एफआयआरची प्रत उपलब्ध करुन द्यावी, अशी तक्रारदारांची मागणी आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance