महापौर पदासाठी निश्चिती न केल्याने नगरसेवक विजय शिंदे नाराज
पिंपरी, ता. २ - संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदासाठी प्रभाग क्रमांक ६ मधून बिनविरोध निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवी लांडगे व उपमहापौरपदासाठी आणि प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आलेल्या शर्मिला बाबर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, पक्षाच्या या निर्णयामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेले नगरसेवक विजय उर्फ शितल शिंदे फार नाराज होऊन महापालिकेतून निघून गेले.
प्रभाग क्रमांक १९ मधून निवडून आलेले माजी नगरसेवक विजय शिंदे हे महापौर पदावर विराजमान होण्यासाठी इच्छुक होते. ते तीन वेळा नगरसेवक बनले असल्याने प्रशासनाचा मोठा अनुभव त्यांना होता. प्रभाग क्रमांक १९ बरोबरच शहरभरात विजय शिंदे यांचे काम शहरवासियांना माहिती आहे. त्यामुळे आपले नाव महापौरपदासाठी निश्चित होईल याची त्यांना मोठी आशा होती. मात्र, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पाठवलेल्या पत्रात विजय शिंदे यांचे नाव उपमहापौर पदासाठी निश्चित केल्याचे समजले आणि शिंदे नाराज झाले. हे पत्र न स्विकारता ते सोमवारी (ता. २) महापालिकेत सुरु असलेल्या पक्षाच्या बैठकीतून निघून गेले.