महिलांच्या सुरक्षिततेसाठी नारायणगाव पोलिसांचा पुढाकार; वारूळवाडी मार्केटमध्ये निर्भया पथकाकडून जनजागृती

महिलांच्या सुरक्षिततेसाठी नारायणगाव पोलिसांचा पुढाकार; वारूळवाडी मार्केटमध्ये निर्भया पथकाकडून जनजागृती

नारायणगाव : महिला आणि युवतींची सुरक्षितता, सायबर फसवणुकीपासून संरक्षण तसेच बालकामगार प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी नारायणगाव पोलिसांच्या निर्भया पथकाने वारूळवाडी येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेतला. कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नरच्या उपबाजार आवारातील धना-मेथी मार्केटमध्ये झालेल्या या उपक्रमात महिला, युवती, शेतकरी, वाहनचालक आणि हमालांना सुरक्षिततेविषयी माहिती देण्यात आली.

नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला. निर्भया पथकाच्या प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे यांनी कामाच्या ठिकाणी महिलांनी घ्यावयाची खबरदारी, छळ किंवा गैरवर्तन झाल्यास पोलिसांची मदत मिळविण्याचे मार्ग आणि मोबाईलच्या सुरक्षित वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खात्याची गोपनीय माहिती आणि ओटीपी कोणालाही सांगू नये, तसेच संशयास्पद फोन व संदेशांपासून सावध राहावे, अशा सूचना पोलिसांनी दिल्या.

वारूळवाडीतील धना-मेथी मार्केटमध्ये दररोज महिला, शेतकरी, वाहनचालक आणि कामगारांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना काळजी घेण्याबाबत उपस्थितांना सांगण्यात आले. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी आणि संकटाच्या प्रसंगी मदत मागण्यास संकोच करू नये, असेही आवाहन करण्यात आले.

महिला व युवतींना छळ, गैरवर्तन किंवा धमकीचा सामना करावा लागल्यास त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा, असे स्वाती धोंगडे यांनी सांगितले. अशा घटनांकडे दुर्लक्ष न करता वेळेत माहिती दिल्यास पोलिसांना आवश्यक कार्यवाही करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया पथक कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मदतीसाठी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या 02132-242033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यक्रमात करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत तातडीच्या पोलीस मदतीसाठी डायल 112 या क्रमांकाचा वापर करण्याबाबतही उपस्थितांना सांगण्यात आले.

कार्यक्रमात बालकामगार प्रतिबंधाबाबत प्रबोधन करण्यात आले. अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्यासंदर्भातील कायदेशीर नियमांचे पालन करावे, असे वाहनचालक, हमाल आणि अन्य उपस्थितांना सांगण्यात आले. महिला सुरक्षा, सायबर गुन्हे प्रतिबंध आणि बालकामगार निर्मूलनाविषयी विविध घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.

यावेळी पोलीस हवालदार सुवर्णा गडगे, पोलीस कॉन्स्टेबल तांगडकर, वारूळवाडीचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ, बाजार समितीचे अधिकारी शरद घोंगडे आणि अजित भुजबळ उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Recent News

Top Categories