मोशीत एमडी व अफूची आंतरराज्य तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक; 4.30 लाखांचा मुद्देमाल जप्त
मोशी | 4 सप्टेंबर 2026 : मोशी परिसरात मेफेड्रोन अर्थात एमडी आणि अफूची आंतरराज्य तस्करी केल्याच्या आरोपावरून अमली पदार्थविरोधी पथकाने 2 जणांना अटक केली. आरोपींकडून 71 ग्रॅम 720 मिलीग्रॅम एमडी, 108 ग्रॅम 730 मिलीग्रॅम अफू, 2 मोबाइल, डिजिटल वजनकाटा आणि एक दुचाकी असा एकूण 4 लाख 30 हजार 25 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमली पदार्थांची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. या कारवाईसाठी पथकाच्या वेगवेगळ्या तुकड्या तयार करण्यात आल्या होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार विजय दौडकर यांना मोशी परिसरात दोन व्यक्ती अमली पदार्थांच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास देहू-मोशी रस्त्यावरील बोराटे वस्ती परिसरात सापळा रचला.
कारवाईदरम्यान आकाश कुमार भेराराम बिश्नोई - वय 21 याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 71 ग्रॅम 720 मिलीग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
दुसरा आरोपी प्रविण कुमार हिराराम बिश्नोई - वय 18 याच्याकडून 108 ग्रॅम 730 मिलीग्रॅम अफू जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी हे अमली पदार्थ परस्पर संगनमताने, कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय विक्रीसाठी वाहतूक करत आणि ताब्यात बाळगत असल्याचा आरोप आहे.
अमली पदार्थांसह आरोपींकडून 2 मोबाइल, एक डिजिटल वजनकाटा आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली. संपूर्ण मुद्देमालाची किंमत 4 लाख 30 हजार 25 रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 17(ब), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा स्रोत, संभाव्य ग्राहक आणि तस्करीमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा तपास सुरू आहे.