मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात ‘नाना पाटेकर नाट्यगृह’ उभारा; आमदार महेश लांडगेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात ‘नाना पाटेकर नाट्यगृह’ उभारा; आमदार महेश लांडगेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी-चिंचवड : मोशी–चऱ्होली–चिखली परिसरात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने भव्य नाट्यगृह आणि बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र उभारावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. प्रकल्पासाठी योग्य जागा निश्चित करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी विनंती त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत असून, नव्याने विकसित होणाऱ्या निवासी भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सुसज्ज सभागृहांची आवश्यकता वाढत आहे. नाट्यप्रयोग, संगीत मैफिली, साहित्य संमेलने, व्याख्याने आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी मोठ्या क्षमतेचे आधुनिक सभागृह उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.

मोशी, चऱ्होली आणि चिखली परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प उभे राहत आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत स्थानिक कलाकार, नाट्यसंस्था, शाळा आणि महाविद्यालयांच्या सांस्कृतिक गरजांचाही विचार होणे आवश्यक असल्याची भूमिका लांडगे यांनी मांडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचाच्या धर्तीवर आधुनिक सुविधांनी युक्त नाट्यगृह उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी, रंगभूमी तसेच सामाजिक क्षेत्रातील नाना पाटेकर यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून प्रस्तावित वास्तूला ‘नाना पाटेकर नाट्यगृह व सांस्कृतिक केंद्र’ असे नाव द्यावे, असे पत्रात म्हटले आहे. या केंद्रामुळे नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रस्तावित नाट्यगृहात प्रशस्त रंगमंच, दर्जेदार ध्वनी व प्रकाशयोजना, कलाकारांसाठी स्वतंत्र कक्ष आणि सरावासाठी जागा असावी. लहान कार्यक्रमांसाठी स्वतंत्र सभागृहाची सुविधाही उपलब्ध करावी, अशी मागणी आहे. दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेशव्यवस्था, सुरक्षा सुविधा, पुरेसे वाहनतळ आणि सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता यांचाही नियोजनात समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.

प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन जागा निश्चिती आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे लांडगे यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी. तसेच सर्वसाधारण सभेची मान्यता मिळविण्यासाठी आवश्यक ठराव मंजूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

शहराची ओळख औद्योगिक नगरीबरोबरच सांस्कृतिक आणि कलाविश्वातील महत्त्वाचे केंद्र म्हणून निर्माण व्हावी, असा आपला प्रयत्न असल्याचे लांडगे यांनी सांगितले. आधुनिक नाट्यगृहामुळे स्थानिक नाट्यसंस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिभावंतांना संधी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या हा प्रकल्प मागणीच्या स्वरूपात असून, जागा निश्चिती, प्रकल्प अहवाल आणि मान्यतेची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती महापालिकेकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories