राहाटणीत स्पा चालकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; 10 हजार स्वीकारताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

राहाटणीत स्पा चालकाकडे 50 हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप; 10 हजार स्वीकारताना आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पिंपरी-चिंचवड : राहाटणीतील स्पा सेंटरचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी ₹50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागणीतील ₹10 हजार स्वीकारताना आरोपी पंचांसमक्ष आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली. अक्षय अरुण वाघमारे (वय 35, रा. खडकी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी साजिद मन्सुर पेंढारी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीने त्यांच्या स्पा सेंटरसमोर येऊन डायल 112 वर संपर्क साधला आणि पोलिसांना खोटी माहिती दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यानंतर झालेल्या संपर्कात आरोपीने स्पा सेंटरचा व्यवसाय चालवायचा असल्यास ₹50 हजार देण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पैसे न दिल्यास स्पा सेंटरबाबत वर्तमानपत्रात बातमी देऊन व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. यासोबतच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी नोंदवले आहे.

राहाटणीतील जगताप डेअरी चौकाजवळील साई कॉर्नर येथे आरोपी कारमधून आला होता. तेथे फिर्यादीकडून ₹10 हजार स्वीकारलेल्या स्थितीत तो पंचांसमक्ष आढळल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची नोंद काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 622/2026 अन्वये करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मेटे यांच्याकडे तपासाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories