चिखली | २९ ऑगस्ट २०२६ : रुपीनगर परिसरातील हॉटेलजवळ झालेल्या वादातून दोन जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तरुणाच्या उजव्या कानाजवळ आणि डोक्याच्या डाव्या बाजूला वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी यासिन इद्रिस शेख (वय २३, विद्यार्थी, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रतीक काळे आणि ओम्या ऊर्फ ओमकार सोनावणे, दोघेही रा. रुपीनगर, यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यासिन आणि त्याचे मित्र साईराज रोहन पारवे (वय १८) व अनिकेत मारुती चव्हाण (वय २०) हे सर्वजण रुपीनगरमधील हनुमान मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पिनकोड चिकन नावाच्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.
त्यावेळी आरोपी प्रतीक आणि ओमकार यांनी फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. फिर्यादीने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यालाही मारहाण केली. यावेळी आरोपींनी जवळील धारदार शस्त्राने यासिनच्या उजव्या कानाजवळ आणि डोक्याच्या डाव्या बाजूला वार करून त्याला गंभीर जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८४/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.