शहरवासियांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पवनाथडी जत्रेचा समारोप
पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'पवनाथडी जत्रेचा' रविवारी (ता. १) शहरवासियांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने समारोप झाला. यंदा पवनाथडी जत्रेत तब्बल २ कोटींची उलाढाल झाली. समारोपावेळी बचत गटांच्या प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला. सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर ही जत्रा झाली.
समारोप समारंभाला उपमहापौर शर्मिला बाबर, भाजप गटनेते प्रशांत शितोळे, नगरसेविका तृप्ती कांबळे, उज्वला ढोरे, अनुराधा गोरखे, सुषमा तनपुरे, महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपआयुक्त ममता शिंदे आदी उपस्थित होते. उपमहापौर शर्मिला बाबर, प्रशांत शितोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
समाजविकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे म्हणाल्या, ''पाच दिवसांत तब्बल २ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. हे महिलांच्या कष्टाचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. जत्रेत पारंपरिक खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, गृहउपयोगी साहित्य, दागिने, कपडे तसेच ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे स्टॉल्स यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना मोठी मागणी होती. ''
समारोप सत्रात 'द फोक लावणी' कार्यक्रमाने जत्रेची रंगत वाढवली. विजय उल्पे यांनी सूत्रसंचालन केले. मनोज बरगडे यांनी आभार मानले.