शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी

पिंपरी, ता. २० - 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय भवानी, जय शिवाजी' या अखंड जयघोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. विविध संस्था, संघटनांनी शहरातील शिवाजी विविध ठिकाणी असलेल्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच शाळा, महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. शहरात चौकाचौकांत घुमाणाऱ्या पोवाड्यांतून शिवरायांचा पराक्रम कानी पडत होता. सकाळी आणि सायंकाळी मिरवुकांद्वारे शिवरायांचा जन्मोत्सव तमाम शहरवासियांनी जल्लोषात साजरा केला.

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील मुख्य कार्यालयात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या तहसीलदार आशा होळकर मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ''शिवरायांचे प्रशासकीय कौशल्य आणि लोककल्याणाचे धोरण आजही तितकेच मार्गदर्शक आहे.'' 

अखिल आकुर्डी गाव शिवजयंती उत्सव समितीतर्फे आकुर्डीत 'एक गाव एक शिवजयंती' उपक्रम राबविला. 'महाराष्ट्राची लोकधारा' या लोककला व लोकपरंपरेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रहाटणी येथे अखिल रहाटणी गाव शिवजयंती उत्सव समितीने 'एक गाव एक शिवजयंती' उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, रहाटणी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. सिंहगडावरून आणलेल्या पवित्र ज्योतीचे उत्साहात आगमन झाले. यावेळी नगरसेवक सागर कोकणे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, नगरसेविका अर्चना तापकीर, ग क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी किशोर ननवरे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आदींसह विविध मंडळांचे पदाधिकारी व रहाटणी-काळेवाडी, पिंपळे सौदागर परिसरातील शिवप्रेमी उपस्थित होते. हिंजवडीमध्ये ''एक गाव एक शिवजयंती' उत्सव साजरा केला.

भक्ती-शक्त्ती शिवजयंती उत्सव समितीतर्फे निगडी येथील भक्ती-शक्ती समूहशिल्प परिसरात रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. उपमहापौर शर्मिला बाबर यांनी भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान, प्रेमलोक पार्क चिंचवड, थेरगाव येथील डांगे चौक, थेरगाव गावठाण, रहाटणी, पिंपरी बाघेरे गावठाण, फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

निगडी येथील सिद्धीविनायकनगरीमध्ये शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तानाजी काळभोर यांनी मनोगत मांडले. ''छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा, स्वराज्य स्थापनेचा यांचा गौरव करुन शिवरायांच्या विचारांचे आचरण आपण सर्वांनी केले पाहिजे.'', असे काळभोर म्हणाले.  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सिद्धीविनायक नगरीतील सरस्वती साबळे यांनी मध्य प्रदेश येथे झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व ब्राँझ अशी तीन पदके पटकाविल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिवभक्त संस्कृती सुधीर ढगे-पाटील हिने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपुढे मानवंदना दिली. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय', 'जय जिजाऊ, जय शिवराय' अशा जयघोषांनी परिसर भारुन गेला. कार्यक्रमास शिवाजी काळभोर, उमाशंकर सिंह, सुधीर ढगे पाटील, नंदू भागवत, बाळासाहेब आवंढे उपस्थित होते.


पिंपळे सौदागरमध्ये शिवजयंती उत्सव दिमाखात साजरा झाला. परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था, मंडळे व सामाजिक संस्थांच्या वतीने आकर्षक सजावट, अभिवादन, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच शिवप्प्रतिमांचे पूजन, दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करुन नागरीकांनी शिवरायांना अभिवादन केले. यावेळी 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वानी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत शिवजयंतीचा उत्सव साजरा केला. गृहरचना संस्थांमध्ये शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, पोवाडे, लेझीम, ढोल-ताशा व देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. आरोग्य तपासणी व सामाजिक उपक्रम झाले. 

सांगवी ज्येष्ठ नागरिक संघांतर्फे व विविध संस्थांमार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. जुनी सांगवीतील तलाठी आरोग्य कार्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. आरोग्य निरीक्षक संदीप राठोड, संतोष कदम, वरुण कांबळे, नारायण शितोळे, शिरीष कोकाटे, सागर भांडे, मीनानाथ काजळे, अमन बिराडे आणि बंडू जाधव यावेळी उपस्थित होते. महिला सदस्यांनी 'शिवरायांचा पाळणा' गायला. संघाचे अध्यक्ष कमलाकर जाधव, विष्णुपंत झांजुर्णे, सुरेंद्र शेळके, शिवाजी बंडगर, कल्पना देवकर आणि अनिता गाढवे संघातील ज्येष्ठ नागरिक, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनीही या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थिती लावत शिवरायांचा जयजयकार केला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance