news
clock
प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा - नगरसेविका सुलभा उबाळे

प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा - नगरसेविका सुलभा उबाळे

प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा - नगरसेविका सुलभा उबाळे 

महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर गांभिर्याने चर्चा 

पिंपरी, ता. २१ - प्रशासकीय राजवटीमध्ये झालेला भ्रष्टाचार, चोवीस तास पाण्याची योजना, शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, अवजड वाहनांमुळे अपघातांचे वाढलेले प्रमाण.... असे शहरातील अनेक महत्त्वाचे विषय शुक्रवारी (ता. २०) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गांभिर्याने चर्चिले गेले. महापालिकेची ही पहिलीच सर्वसाधारण सभा ५ तास चालली.  

सभेच्या प्रारंभी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी शहरातील समस्यांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला. भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मांडला. गेल्या दहा वर्षातील कुत्रा चावण्याच्या घटनांची आकडेवारीच मिसाळ यांनी सादर केल्याने या प्रश्नांचे गांभिर्य अधोरेखित झाले. असंख्य नागरीकांच्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत मात्र प्रशासनाकडून कोणतीही उपायोजना केली जात नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त करत मिसाळ यांनी चक्क प्रतिकात्मक कुत्रा प्रशासनाला भेट दिला. त्यानंतर नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील भटक्या कुत्र्यांमुळे तसेच मोकाट गाई, म्हशी, डुकरांमुळे तसेच घुशींचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरीकांना होणारा त्रास प्रशासनासमोर मांडला. प्रत्येक प्रभागात पशुवैद्यकीय अधिकारी नेमावा अशी मागणी मिसाळ यांनी केली. नगरसेविका वैशाली घोडेकर यांनी भटक्या कुत्र्यांसाठी प्रत्येक प्रभागात निवारा केंद्र उभारण्याची मागणी केली. 

त्यानंतर, शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळात झालेल्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. प्रशासकीय काळातील सर्व कामांची श्वेतपत्रिका काढा, अशी जोरदार मागणी केली. 

नगरसेविका उबाळे म्हणाल्या, ''प्रशासकीय काळात अनेक कामे संशयास्पद पद्धतीने आणि घाईगडबडीत करण्यात आली आहेत.  सर्व कामांची सखोल चौकशी होऊन संपूर्ण माहिती सभागृहासमोर मांडावी.  तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांनी घेतलेल्या निर्णयांचीही चौकशी व्हावी. तसेच तत्कालीन आयुक्तांना किमान एकदा तरी ‘पाहुणे आयुक्त’ म्हणून सर्वसाधारण सभेत बोलावून त्यांनी केलेल्या कामांबाबत स्पष्टीकरण द्यावे.'' त्यावर पुढच्या सर्वसाधारण सभेपूर्वी कार्यवाही करण्याचे आश्वासन महापौर रवी लांडगे यांनी दिले. 

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर अधिकाऱ्यांचा माज संपवायलाच हवा अशी आक्रमक भूमिका घेतली. भोईर म्हणाले, ''गेल्या चार वर्षांतीलच नव्हे तर सन २०१७ पासून महापालिकेने केलेल्या सर्व कामांची  चौकशी करा. अधिकारी मालक झाले आहे, आता माज संपवायला हवा.'' ''आता महापौरांचा काळ सुवर्णकाळ आहे. परंतु, महापालिकेची तिजोरी रिकामी आहे. त्यामुळे आता महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. '' असा महत्त्वाचा मुद्दा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी अधोरेखित केला. इतर नगरेसवक नितीन काळजे, संदीप चाघेरे,  राहुल जाधव, विश्वजित बारणे, विनोद नढे यांनीही शहरातील प्रश्न मांडले. 

सर्वसाधरण सभेतील चर्चेवेळी शहरातील पाणी, कचरा, रस्ते या प्रश्नांचे निराकरण पुढील सभेपर्यंत व्हायला हवे. तसेच महापालिकेच्या सभागृहात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी आमदार लक्ष्मण जगताप यांचे तैलचित्र लावण्यासाठी तसेच अजितसृष्टी निर्माण करण्यासाठी महापौर रवी लांडगे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण करणे व निवारा केंद्र उभारणे तसेच इतर नागरी प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाही करावी अशा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories